(खेड)
राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक आणि वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे MIDC परिसरातील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवण्यात आला असून रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून विविध भागांत त्याचे वितरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची साठवणूक आणि वितरण सुरू असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतेच गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेत मोकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरात कथित गुटखा तस्करीचे रॅकेट सुरू असल्याचा दावा समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी संबंधित गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कथित स्टिंग ऑपरेशननंतर अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत गंभीर दखल घेतात आणि पुढे कोणती कारवाई करतात, याकडे आता खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुटखाबंदी असूनही सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व्यवहारांबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

