(चिपळूण / वार्ताहर)
धामणवणे गावचे माजी सरपंच आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते संभाजी जाधव यांचे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने धामणवणे परिसरातील सामाजिक क्षेत्रासह आंबेडकरी चळवळीची ज्येष्ठ पिढीतील एक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
संभाजी जाधव यांनी १९७० ते २०१० या तब्बल ४० वर्षांच्या कालावधीत आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे योगदान दिले. धामणवणे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे गट) या पक्षात त्यांनी अनेक वर्षे काम केले. पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
चिपळूण पंचायत समितीचे सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव यांचे संभाजी जाधव हे वडील होत. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.


