(संगमेश्वर / एजाज पटेल)
शास्त्रीपूल ते डिंगणी मुख्य रस्त्यावर गॅस पाईपलाईनच्या कामामुळे निर्माण झालेल्या चिखलाच्या समस्येचा आणि त्यामुळे प्रवाशांसह एसटी प्रशासनाला सहन कराव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीचा मुद्दा समोर आल्यानंतर डिंगणी गावचे माजी उपसरपंच तथा संगमेश्वर तालुका भाजपचे उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाचा त्रास प्रवासी, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्ता पूर्ववत न केल्यास जनहितासाठी सुरू असलेले काम बंद पाडू, असा स्पष्ट इशारा निकम यांनी दिला आहे.
गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्यापासून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराला आपण वारंवार सूचना आणि विनंत्या केल्या होत्या. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही कामाच्या पद्धतीत कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. कामाचे योग्य नियोजन नसल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मिथुन निकम यांनी स्पष्ट केले.
अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून एसटी बससह खासगी वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली. डिंगणी-करजुवे मार्गावरील एसटी सेवा दुसऱ्या दिवशीही बंद राहिल्याने विद्यार्थी, रुग्ण आणि नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गॅस पाईपलाईन भूमिगत करण्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रवासी जनतेचा आरोप योग्य असल्याचे मतही निकम यांनी व्यक्त केले.
गॅस पाईपलाईनचे काम महत्त्वाचे असले तरी विकासकामाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. रस्त्याची झालेली दुरवस्था, चिखलामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका आणि एसटी सेवा बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला भोगावा लागणारा त्रास याची जबाबदारी ठेकेदाराने स्वीकारली पाहिजे. काम पूर्ण करण्याच्या घाईत सार्वजनिक रस्त्याची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे निकम यांनी ठणकावून सांगितले.
संबंधित ठेकेदाराने मनमानी कारभार थांबवून रस्त्यावर साचलेली माती आणि चिखल तातडीने हटवावा. तसेच रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी योग्य करावा आणि पुढील कामादरम्यान प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास सुरू असलेले काम बंद पाडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही मिथुन निकम यांनी दिला.
आपली ही भूमिका कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नसून प्रवासी जनता, ग्रामीण भागातील रुग्ण तसेच शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा त्रास नागरिकांनी आणखी किती काळ सहन करायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठेकेदाराच्या कामामुळे एसटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असताना संबंधित यंत्रणा याची दखल घेणार का, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.
सार्वजनिक रस्त्याच्या कामामुळे जनतेलाच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मिथुन निकम यांच्या इशाऱ्यानंतर संबंधित ठेकेदार रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलणार की नागरिकांना पुन्हा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


