( पुणे )
पुणे शहरातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्या शहराचे महासचिव असलेले प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वागणूक व विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय आणि पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार महिला पोलीस निरीक्षक या पुणे पोलीस दलातील असून, त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमोद कोंढरे यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांना अयोग्य आणि अश्लील पद्धतीने स्पर्श केला. या वर्तनामुळे त्या अत्यंत अपमानित व असुरक्षित वाटल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीदरम्यान घडली. व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडताना चहाच्या दुकानाजवळ कोंढरे यांनी मागून धक्का दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर आयुक्तांनी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर अधिकृत एफआयआर नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी अशा प्रकारचे वर्तन केवळ महिलांचा नव्हे, तर संपूर्ण पोलीस यंत्रणेचा आणि कायद्याचा अपमान आहे,” असे त्या म्हणाल्या.
या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. “पोलीस खात्यातील महिलांवरच असे प्रकार होत असतील, तर सामान्य महिलांची अवस्था काय असू शकते?” असा संतप्त सवाल सोशल मीडियावर आणि जनतेतून विचारला जात आहे.
गुन्हा स्पष्टपणे सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज हाती असल्याने आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पोलीस प्रशासनाने प्रकरण पारदर्शकपणे हाताळण्याचे आश्वासन दिले आहे.