(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अंतराळ संशोधनाची गोडी लहानपणीच लागावी, यासाठी जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमाला मोठे यश लाभले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील तब्बल २२ विद्यार्थ्यांची निवड थेट अमेरिकेतील नासाला भेट देण्यासाठी झाली असून, हे विद्यार्थी येत्या ३१ जुलै रोजी अमेरिका गाठणार आहेत.
या अभ्यासदौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांना नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने शाळास्तरावर आयोजित केलेल्या निवड चाचणीमधून प्रारंभी ५५ विद्यार्थी निवडले गेले होते. त्यातून २२ विद्यार्थी नासासाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे.
दौऱ्याची पार्श्वभूमी अशी की, या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच विद्यार्थी अमेरिकेला जाणार होते. मात्र भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे दौऱ्याला विलंब झाला. आता युद्धविराम जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून, जुलैअखेर ही झेप घेतली जाणार आहे.
या उपक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष रस दाखवून निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधूनही ७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील मार्तड नरेंद्र गावंड आणि सिद्धी संदीप स्वामी हे दोन विद्यार्थी नासासाठी अंतिमतः पात्र ठरले आहेत.
नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी
ऋतिका खापरे, शौर्य जाधव, श्रेयस पवार, जान्हवी तांबुटकर, समीक्षा बोडेकर, अंशुल पाटील, पद्मश्री गोंडाळ, यशस्वी चव्हाण, देवयानी आग्रे, आदित पवार, शिवाली घुमे, सृष्टी भुवड, कार्तिकी सागवेकर, श्रावणी गमरे, सोहम बावधनकर, स्वरा लांजेकर, अर्णव शिंदे, भावना सावंत, लावण्या पवार, सुनीता तावडे, मार्तड गावंड आणि सिद्धी स्वामी. विद्यार्थ्यांच्या अंतराळ प्रवासाची ही सुरुवात केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, त्यांच्या भविष्याचा खगोलीय मार्ग उजळवणारी ठरणार आहे.