(संगमेश्वर / एजाज पटेल)
शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अर्थात “हर घर नल से जल” योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. या योजनेसाठी शासनाकडून लाखो-कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही योजना केवळ कागदोपत्रीच प्रभावी ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी अद्यापही जलजीवन योजनेची कामे अपूर्ण आहेत. कुठे पाईपलाईनची कामे अर्धवट सोडली गेली आहेत, तर कुठे जल टाक्या आणि पंपिंग यंत्रणा निकृष्ट दर्जाची ठरली आहेत. परिणामी नागरिकांना वेळेत आणि पुरेसा शुद्ध पाणीपुरवठा होत नाही.
पावसाळ्याच्या तोंडावर असताना देखील अनेक गावांमध्ये नळांना दूषित आणि अपुरं पाणी येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये पोटदुखी, जुलाब, त्वचारोग यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कामांची जबाबदारी घेतलेल्या काही ठेकेदारांनी बिले उचलून कामे अपूर्ण ठेवली असून, उर्वरित काम पूर्ण करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. त्यातच प्रशासनाकडूनही या अपूर्ण कामांकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
जल जीवन मिशनच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही संगमेश्वर तालुक्यात योजनेचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने ही योजना अपयशी ठरतेय का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
गावोगावातील नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत, अपुर्या व निकृष्ट कामांचा तपास करून दोषींवर कारवाई करावी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा.

