( मुंबई )
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून उपाधी नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयीन प्रकरणाच्या केस टायटलमध्ये ‘पद्मश्री’ शब्द वापरण्यावर आक्षेप घेत न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर संबंधित याचिकेची सुनावणी सुरू होती. 2004 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे या प्रकरणातील एक पक्ष होते. केस शीर्षकात त्यांचे नाव ‘पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर’ असे नमूद करण्यात आले होते. न्यायालयाने हे कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करत त्यावर आक्षेप नोंदवला.
या संदर्भात न्यायालयाने 1995 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला दिला. त्या निर्णयात पद्म पुरस्कार आणि भारतरत्न या उपाधी नसून त्यांचा वापर नावापूर्वी किंवा नंतर करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम 141 अंतर्गत सर्वांवर बंधनकारक आहे आणि त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पुढील सर्व न्यायालयीन कार्यवाहीत हा नियम पाळला जावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
पद्म पुरस्कारांची सुरुवात देशात 1954 मध्ये झाली. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे चार प्रमुख नागरी पुरस्कार असून दरवर्षी 26 जानेवारी रोजी त्यांची घोषणा केली जाते. मार्च किंवा एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात पुरस्कार प्रदान सोहळा होतो. पुरस्कारामध्ये पदक आणि प्रशस्तिपत्र दिले जाते.
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राष्ट्रीय सेवा, क्रीडा, विज्ञान, साहित्य आणि कला या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. दरवर्षी जास्तीत जास्त तीन व्यक्तींनाच भारतरत्न प्रदान केला जाऊ शकतो. आतापर्यंत 48 जणांना हा सन्मान मिळाला असून, 1954 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आला होता.
तीन श्रेणींमध्ये पद्म पुरस्कार
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीन श्रेणींमध्ये पद्म पुरस्कार दिले जातात. कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योग, व्यवसाय, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी हे सन्मान दिले जातात. यंदा क्रिकेटपटू आर. अश्विन यांच्यासह 71 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

