(खेड / वार्ताहर)
कपडे धुण्यासाठी जगबुडी नदीच्या विसर्जन घाटावर गेलेली ८० वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना खेड शहरात उघडकीस आली आहे. लक्ष्मी गोविंद भोसले असे या महिलेचे नाव असून, त्यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी गोविंद भोसले या १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी कपडे धुण्यासाठी खेड येथील जगबुडी नदी विसर्जन घाटावर गेल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत त्या नदीवर कपडे धुत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. बराच वेळ होऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
परिसरातील विविध ठिकाणी शोध घेऊन तसेच नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही लक्ष्मी भोसले यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांचे भाचे मनोज राजाराम मोरे (वय ४०, रा. नवानगर, पालेकर हॉस्पिटल शेजारी, महाडनाका, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२८ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ नोंदविण्यात आला. लक्ष्मी भोसले यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता लक्ष्मी गोविंद भोसले यांचे वय ८० वर्षे असून त्या महाडनाका, खेड येथील रहिवासी आहेत. वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, लक्ष्मी भोसले यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


