(रत्नागिरी /प्रतिनिधी)
डेंगीसारख्या आजारात रुग्णाच्या उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आणि खासगी रुग्णालयांत खर्चिक असलेली ‘प्लेटलेट्स अफेरेसिस’ सुविधा रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तकेंद्रात पुन्हा सुरू झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा कार्यान्वित झाली असून, तिचा लाभ पहिल्याच दिवशी एका डेंगीग्रस्त रुग्णाला मिळाला.
डेंगीसारख्या आजारात काही रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. अशा वेळी प्लेटलेट्स मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची होणारी धावपळ, वेळेची निकड आणि उपचारांचा वाढता खर्च यामुळे कुटुंबीयांवरील ताण अधिकच वाढतो. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयातच सिंगल डोनर प्लेटलेट्स उपलब्ध होण्याची सुविधा सुरू झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेच्या पुनर्प्रारंभाला पहिल्याच दिवशी माणुसकीची जोड मिळाली. रत्नागिरीतील पराग पाटील यांनी सिंगल डोनर प्लेटलेट्ससाठी रक्तदान केले. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या रक्तदानातून संकलित करण्यात आलेले प्लेटलेट्स दोन नोव्हेंबर रोजी चिंतामणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंगीग्रस्त प्रेरणा प्रशांत जाधव यांना देण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही सुविधा पुन्हा सुरू झाल्याने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रत्नागिरीच्या आरोग्यसेवेला बळ मिळाले आहे. यासोबतच, पराग पाटील यांच्या रक्तदानामुळे या सुविधेच्या पहिल्याच दिवशी एका रुग्णाला मदतीचा हात मिळाला. शासकीय यंत्रणेची उपलब्ध सुविधा आणि रक्तदात्याची सामाजिक बांधिलकी यांचा हा समन्वय रुग्णांसाठी आश्वासक ठरणारा आहे.


