( दापोली )
तालुक्यातील करजगाव (चिपळुणकरवाडी) येथील सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन सुदेश केशव चिपळुणकर (वय ५७) यांच्या राहत्या घरात घुसून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद चंद्रकांत धयाळकर (सध्या रा. मुंबई) व इतर तीन जणांविरोधात दापोली पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास करजगावातील चिपळुणकरवाडीत घडली. आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी चिपळुणकर यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांच्यावर, त्यांच्या पत्नी व मातेसह, हाताने मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सुदेश चिपळुणकर यांनी दिली आहे. सुदेश चिपळुणकर यांनी एक वर्षांपूर्वी गावातील विहिरीच्या बांधकामासाठी सुरुंग लावण्यास ग्रामपंचायतीकडे विरोध दर्शवला होता. याच रागातून संशयित आरोपींनी ही आक्रमक कृती केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. ११७/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९(२), १९१(१), १९०, ११५(२), ३३२(ग), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

