(मुंबई)
हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला 48 वर्षांनंतर अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोलाबा पोलिसांनी चंद्रशेखर मधुकर कालेकर याला सुरुवातीला लालबाग परिसरातून अटक केली होती. आरोपी 71 वर्षांचा असून त्याने 1977 मध्ये आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला होता.
प्रेमप्रकरणातून थरारक हल्ला
कोलाबा पोलिसांनी सांगितले की, 1977 मधील ही घटना आहे. 23 वर्षांचा असताना कालेकरने आपल्या प्रेयसीवर चारित्र्याच्या संशयातून प्राणघातक हल्ला केला. कोलाबा परिसरात ही घटना घडली. त्यावेळी त्याला अटक झाली होती, परंतु नंतर जामिनावर सुटका मिळाल्यानंतर तो कोर्टाच्या तारखांना कधीच हजर झाला नाही. निरंतर गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने कालेकरला फरार आरोपी म्हणून घोषित केले. पोलिस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र वारंवार ठिकाण बदलल्याने त्याला शोधणे कठीण झाले होते.
48 वर्षांनी उघडला जुना गुन्हा
सुमारे 6 महिन्यांपूर्वी कोलाबा पोलिसांनी हा जुना गुन्हा पुन्हा उघडला. लालबाग येथील त्याच्या जुन्या घराला भेट दिली, पण तो सापडला नाही. मुंबईतील अनेक ठिकाणांवर त्याचा शोध घेण्यात आला, पण त्याचा ठावठिकाणा मिळालेला नव्हता. तपासादरम्यान आरटीओ आणि न्यायालयीन नोंदी तपासल्या असता, 2015 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलिस स्टेशनमध्ये अपघातातील जखमी प्रकरणात या नावाच्याच एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे आढळले. या दरम्यान, आरोपी हाती लागत नसल्याचं बघता पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि आरटीओ विभागाच्या पोर्टलवर चंद्रशेखर मधुकर कालेकर नाव सर्च केलं. निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर केवळ एकच चंद्रशेखर मधुकर कालेकर पोलिसांना सापडले, ते होते रत्नागिरीच्या दापोलीत रहाणारे.
मुंबई पोलिसांनी दापोली पोलीस ठाण गाठलं, इथे त्यांना चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाच्या गृहस्थांवर 2015 सालचा अपघाताचा गुन्हा असल्याच समजलं. एवढंच नव्हे तर त्यांचा वाहनचालक परवाना देखील मिळाला, ज्यावर त्यांचा फोटो होता. पण इथे देखील पत्त्याची अडचण, हा पत्ता काही दिवस पोलिसांना सापडत नव्हता. नंतर सर्च ऑपरेशन करत पोलीस टीम त्याच्या घरापर्यंत पोहोचली आणि त्याला बेड्या ठोकल्या. पोलीसांना अचानक पाहून 71 वर्षीय कालेकर स्तब्ध झाला. जुना गुन्हा जवळपास विसरला होता. जुना फोटो ओळखणे पोलिसांसाठी आव्हान ठरले, पण चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी वाहनचालक परवान्यावरचा फोटो लालबाग येथील रहिवाशांना दाखवला आणि कालेकरांच्या समवयस्क वयाच्या लोकांनी हे तेच चंद्रशेखर मधुकर कालेकर असल्याचा दुजोरा दिला. याच चंद्रशेखर कालेकरांचा कुलाबा पोलीस मागील 48 वर्षांपासून शोध घेत होते. पोलीस आल्याचं पाहताच कालेकरांना देखील धक्काच बसला. अटक करून त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कोलाबा पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून कोठडी सुनावण्यात आली.

