(संगमेश्वर / दिनेश आंब्रे)
लहान मुलांचा हट्ट म्हटला की खेळणी, चॉकलेट आणि खाऊ यांची मागणी सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, संगमेश्वर येथील चिमुकली अदिहा पटेल हिचा हट्ट इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा आहे. बाजारपेठ असो, उर्स-जत्रा असो किंवा शहरातील मोठे दुकान, तिची नजर खेळणी अथवा खाऊ शोधत नाही, तर ड्रॉईंगच्या वह्या, पेन्सिली आणि रंगपेट्यांचा शोध घेत असते. चित्रकलेच्या साहित्याबद्दल असलेली तिची ही विलक्षण ओढ सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
संगमेश्वरचे पत्रकार एजाज पटेल यांची कन्या अदिहा सध्या इयत्ता दुसरीत शिकत आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून तिचे कागद, पेन्सिल आणि रंगांशी नाते जुळले. लहान वयातच चित्रे काढण्याची आवड निर्माण झालेल्या अदिहाने कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वतःच्या कल्पनाशक्तीतून चित्रे साकारण्यास सुरुवात केली. कागदावर विविध रेषा आणि आकार रेखाटणे, त्यांना वेगवेगळ्या रंगांनी सजवणे यात ती रमते. तिच्या या छंदामागे कोणाचाही दबाव किंवा बंधन नसून चित्रकलेची नैसर्गिक आवड हेच तिचे प्रेरणास्थान आहे.
विशेष म्हणजे, बाजारात किंवा जत्रेत गेल्यानंतर इतर मुलांप्रमाणे खेळणी आणि खाऊचा हट्ट करण्याऐवजी अदिहा ड्रॉईंग वही, पेन्सिली आणि रंगपेटी घेण्याचा आग्रह धरते. चित्रकलेचे साहित्य मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद तिच्या या आवडीची साक्ष देतो. मोबाईल आणि दूरचित्रवाणीकडे मुलांचा वाढता कल असताना कागद, पेन्सिल आणि रंगांमध्ये रमणारी अदिहा वेगळी ठरते. तिच्यासाठी चित्रकलेचे साहित्य हे केवळ वस्तू नसून स्वतःच्या कल्पना आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनले आहे.
१४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून अदिहाच्या या आगळ्यावेगळ्या आवडीची दखल घेण्यात आली. संगमेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार दिनेश आंब्रे यांनी तिची विशेष भेट घेत तिच्या चित्रकलेचे कौतुक केले. तिच्या रंगांशी जुळलेल्या नात्याचे आणि लहान वयात जोपासलेल्या छंदाचे कौतुक करत त्यांनी तिला गुलाबपुष्प आणि खाऊ भेट दिला. बालदिनाच्या निमित्ताने मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे अदिहाच्या आनंदात भर पडली.
यावेळी संगमेश्वर तालुक्यातील भिरकोंडचे पोलीस पाटील सुभाष गुरव यांनीही उपस्थित राहून अदिहाचे कौतुक केले. गुलाबपुष्प देऊन त्यांनी तिच्या कलेला प्रोत्साहन दिले आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. लहान मुलांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य प्रोत्साहन देणे ही केवळ पालकांचीच नव्हे, तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अदिहाच्या चित्रकलेच्या आवडीला योग्य व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एका चिमुकलीच्या आवडीची दखल घेत तिला प्रोत्साहन देणारा हा छोटेखानी उपक्रम बालदिनाच्या आनंदाला वेगळे महत्त्व देणारा ठरला. प्रत्येक मुलामध्ये एखादा विशेष गुण दडलेला असतो. तो ओळखून त्याला योग्य दिशा आणि संधी देणे महत्त्वाचे आहे. अदिहाच्या बाबतीत कागद, पेन्सिल आणि रंगांनी तिच्या बालपणाला वेगळी ओळख दिली आहे. तिची ही आवड अशीच जोपासली जाऊन तिला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहिल्यास भविष्यात ती चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


