( मंडणगड )
मंडणगड तालुक्यातील वाकवली येथील कोकण वैभव निसर्ग प्रकल्पाच्या रोपवाटिकेमध्ये मोकाट गुरांनी घुसून सुमारे ४३४८ रक्तचंदन जातीच्या रोपांचे सुमारे ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी महाड तालुक्यातील चिंभावे येथील राजू ढेबे या पशुपालकाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकल्प व्यवस्थापक अनिल जार्दन सावंत (वय ५१, सध्या रा. शेनाळे, ता. मंडणगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ मे रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान, आरोपीच्या मालकीची ६ ते ७ मोकाट गुरे रोपवाटिकेत शिरली आणि रक्तचंदन, मोहगणी व आगरवुड या मौल्यवान वनस्पतींच्या रोपांची नासधूस केली. त्यात विशेषतः रक्तचंदनाच्या ४३४८ रोपांचे पूर्णपणे खाल्ल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गु.र.नं. २७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.