(दापोली / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टीच्या 263-दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, पक्षाचा जनसंपर्क आणि विविध सेवा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार प्रमोद जठार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’, ‘गाव तिथे बैठक’ आणि ‘मन की बात’ हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावापर्यंत पक्षाचे संघटन पोहोचविण्यासोबतच नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
गावागावांत बैठका घेऊन स्थानिक प्रश्न जाणून घेणे, नागरिकांशी संवाद वाढविणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन जठार यांनी केले. संघटनात्मक कामकाजाला अधिक व्यापक स्वरूप देत प्रत्येक गावाशी संपर्क मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
या चिंतन बैठकीला रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता जावकर, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सरचिटणीस अक्षय फाटक, वसंत ताम्हणकर, दापोली पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, दापोली शहर मंडल अध्यक्ष व नगरसेविका जया साळवी, दापोली ग्रामीण अध्यक्ष सचिन होडबे, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड नगरपालिका नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघातील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार करण्यात आला.


