(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गॅस कनेक्शनचे बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी अवघे १० रुपये रिचार्ज करण्यास सांगत सायबर भामट्यांनी एका ७६ वर्षीय वृद्धाला तब्बल ५ लाख ५६ हजार ६९१ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील कर्ला कारेकरवाडी येथे उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट ॲप्लिकेशन फाईल उघडून त्यातील सूचनांचे पालन करणे वृद्धाला चांगलेच महागात पडले. या प्रकारामुळे सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या क्लृप्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी जिक्रीया आदम फणसोपकर (वय ७६, व्यवसाय वर्कशॉप, रा. घर नं. ७४२, कर्ला कारेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.४० ते १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२२ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आपण महानगर गॅस एजन्सीतून बोलत असल्याचे सांगत तुमच्या गॅस कनेक्शनचे बिल भरलेले असून, ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी १० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादी यांच्या व्हॉट्सॲपवर ‘Mahanagar Gas’ नावाची ॲप्लिकेशन फाईल पाठवली. फिर्यादी यांनी ही फाईल उघडल्यानंतर त्यामध्ये आपले पूर्ण नाव भरले आणि ॲप्लिकेशनमधील विविध कॉलमवर ओके करत गेले. मात्र, याच प्रक्रियेदरम्यान सायबर भामट्यांनी त्यांच्या कॅनरा बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५६ हजार ६९१ रुपये परस्पर काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फणसोपकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचे नाव व गाव अद्याप समजू शकलेले नाही.
दहा रुपयांच्या रिचार्जचे आमिष दाखवून लाखोंची रक्कम लंपास करण्याचा हा प्रकार नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. गॅस बिल, वीज बिल अथवा बँक व्यवहारांच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर पाठवण्यात येणाऱ्या अनोळखी ॲप्लिकेशन फाईल उघडण्याचे टाळावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.


