(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून एका निष्पाप चिमुकलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ ‘नैसर्गिक अपघात’ नसून, मुजोर ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य डोळेझाकीने घेतलेला बळी असल्याचा संतप्त आरोप आता होत आहे. चिमुकलीच्या मृत्यूपूर्वीच सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरील खडक सैल होत असल्याचे लेखी इशारे देऊनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. या बेजबाबदार कारभाराविरोधात शनिवारी शंभरहून अधिक ग्रामस्थ व भाविकांनी देवरुख पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांना निवेदन सादर केले आणि संबंधित ठेकेदारावर तातडीने ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या फूटब्रिजचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी मंदिरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर नदीपात्रात ५० ते ६० सुरुंग स्फोट घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण स्फोटांच्या हादऱ्यांमुळे डोंगरावरील खडक/ दगड सैल झाले आणि त्याचाच परिणाम होऊन दगड कोसळून चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’मध्ये काम करताना सुरक्षा नियमांची पायमल्ली कोणाच्या आशीर्वादाने झाली आणि या स्फोटांसाठी कायदेशीर परवानग्या होत्या का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला या संभाव्य मृत्यूच्या सापळ्याची पूर्वकल्पना होती; मात्र निवेदनांना केराची टोपली दाखवल्यानेच हा अनर्थ ओढवला असल्याचे पुराव्यांसह समोर आले आहे. यापूर्वी ५ जानेवारी २०२६ रोजी सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरील खडक सैल होत असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यानच गुहेतील सैल झालेला दगड कोसळून काही महिला भाविक जखमी झाल्या होत्या; हा निसर्गाने दिलेला पहिला इशारा होता. या गंभीर प्रकारानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी पुजारी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुख येथील उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन संभाव्य जीवितहानीचा स्पष्ट धोका वर्तवला होता; परंतु संबंधित यंत्रणा शेवटपर्यंत सुस्तच राहिली.
सत्तेचे राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकजूट
प्रशासनाच्या या संवेदनशून्य कारभाराविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ एकवटले आहेत. निवेदन देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद सावंत, शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख सचिन मांगले, माजी उपसभापती छोट्या गावणकर, नगरसेवक बाळा कामेरकर, निदा कापडी, बाळा माने, सामाजिक कार्यकर्ते निखिल कोळवणकर, आकाश भोपळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
जनआंदोलनाचा इशारा
“५ जानेवारी आणि ३० एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनांची वेळीच दखल घेऊन काम थांबवले असते, तर आज एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेला नसता,” अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. आता केवळ चौकशीचे नाटक न करता मुजोर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी; अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.


