(दापोली / वार्ताहर)
दापोली तालुक्यातील हर्णे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ मांडला’ जिल्हास्तरीय प्रो-गोविंदा स्पर्धेत हर्णेच्या श्री नागेश्वर गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि थरारक मानवी मनोऱ्यांनी हर्णे येथील जि. प. मराठी व उर्दू शाळेसमोरील मैदान अक्षरशः दणाणून गेले.
जय भवानी प्रतिष्ठान, हर्णे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय प्रो-गोविंदा स्पर्धेला भारतीय जनता पार्टी दापोली व हर्णे यांचे प्रायोजन लाभले. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या दहा गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचताना गोविंदांनी केलेल्या चित्तथरारक प्रयत्नांना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
स्पर्धेत गोवळकोट-चिपळूण येथील श्री गणेश गोविंदा पथक, दापोलीचे श्री देवी मरीआई प्रतिष्ठान पुरुष गोविंदा पथक, मार्कंडी-चिपळूणचे श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक, जालगाव-दापोलीचे हिंदुराज गोविंदा पथक, फणसवाडी-हर्णेचे श्री नागेश्वर गोविंदा पथक, राजवाडी-हर्णेचे श्री गजानन गोविंदा पथक, मोठी गोडीविहीर-हर्णेचे श्री विठ्ठल गोविंदा पथक, धाकटी गोडीविहीर-हर्णेचे श्री हिंदू एकता गोविंदा पथक आणि दापोली बुरटेवाडीचे श्री कृष्णाई गोविंदा पथक सहभागी झाले होते.
अटीतटीच्या लढतीत फणसवाडी-हर्णेच्या श्री नागेश्वर गोविंदा पथकाने सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. मार्कंडी-चिपळूणच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथकाने द्वितीय, गोवळकोट-चिपळूणच्या श्री गणेश गोविंदा पथकाने तृतीय, तर राजवाडी-हर्णेच्या श्री गजानन गोविंदा पथकाने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या पथकांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील पंच म्हणून प्रो-गोविंदा पंच आशुतोष साळुंखे (उपशिक्षक, पंचनदी हायस्कूल), सत्यवान दळवी (मुख्याध्यापक, आगरवायंगणी हायस्कूल) आणि संदीप क्षीरसागर (क्रीडाशिक्षक, हर्णे हायस्कूल) यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या चाणाक्ष निरीक्षणातून स्पर्धेतील कामगिरीचे योग्य परीक्षण करण्यात आले.
हर्णे येथील या प्रो-गोविंदा स्पर्धेला दापोली तालुक्यातील नागरिक आणि गोविंदा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांचा उत्साह आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.

