( मंडणगड/मुंबई )
मुलीला शाळेच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी सोडण्यासाठी आलेल्या रंजित शांताराम डोंगरे (वय ४४) यांना अचानक पोटदुखीचा त्रास झाल्याने उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १८ जून रोजी दुपारी घडली.
रंजित डोंगरे हे सध्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व येथील महेश पार्कमधील कुसूम निवास येथे वास्तव्यास होते. शाळेला सुट्टी लागल्याने त्यांनी आपल्या मुलीला मूळ गाव म्हाप्रळ अडखळवन (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे सोडले. त्यानंतर अचानक त्यांना पोटदुखीचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने त्यांना म्हाप्रळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे पाठवले. माणगावमध्ये तपासणी करताना त्यांच्या पोटात गंभीर इन्फेक्शन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना तातडीने सर. जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले.
मुंबईत दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि दुपारी २.५० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद आमृ. क्रमांक ०९/२०२५ अन्वये बी.एन.एस.एस कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे. रंजित डोंगरे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.