( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारतीतील एका गोलाकार संरचनेच्या कडेला कबूतरांचा संपूर्ण थवा संध्याकाळच्या सुमारास एका रांगेत विसावलेला दिसून येत असतो. हे दृश्य सकाळ, संध्याकाळ रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांचे आणि कर्मचारी वर्गाचे लक्ष वेधून घेत असते. शांतपणे बसलेली ही शिस्तबद्ध कबूतरांची रांग पाहून प्राणीप्रेमींमध्येही कौतुकाची लहर उमटली.
गोंधळ न करता, आवाज न करता, आपापल्या जागेवर निश्चिंत बसलेली ही कबूतरं जणू निसर्गातील शिस्तीचे सजीव उदाहरणच वाटत होती. माणसांना जिथे सार्वजनिक ठिकाणी अनुशासन पाळायला सांगावे लागते, तिथे ही पक्ष्यांची शांत व समंजस उपस्थिती शिकवण देणारी ठरते. या कबूतरांनी रुग्णालयाच्या एका विशिष्ट कोपऱ्यात आसरा घेतला असून, मानवी वावर असलेल्या जागेवरही त्यांनी आपले अस्तित्व साकारले आहे. मानवनिर्मित संरचनांमध्ये पक्ष्यांनी निवारा शोधणं हे नविन नाही, मात्र सिव्हिलसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे एका रांगेत शांत बसलेले पक्षी दिसणे ही दुर्मीळ बाब मानली जात आहे. कबूतरांच्या या थव्यामुळे सिव्हिलमधील वातावरणात एक अनोखा सौंदर्याचा स्पर्श जाणवत आहे. रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी आणि डॉक्टर वर्गही हे दृश्य पाहून थोडा निवांतपणा अनुभवत असल्याचे चित्र आहे.

प्राणीमित्रांनी या घटनेचे स्वागत करत सिव्हिल प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, तसेच त्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाशी जवळीक निर्माण करणाऱ्या अशा घटनांचा जपून ठेवल्यास शहरातील जैवविविधता टिकवण्यास मदत होऊ शकते, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

