(मंडणगड/ रत्नागिरी)
राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली आणि संथगतीने सुरू असलेली कामे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहेत. शेनाळे गावाच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडलेल्या अपघातात मुंबई–सडे–मंडणगड मार्गावरील एसटी बस रस्ता सोडून दरीकडील बाजूस कलंडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमधील सर्व १८ प्रवासी सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी टळली.
मुंबई सेंट्रल येथून मध्यरात्री १२ वाजता सुटलेली मुंबई आगाराची नियमित बस पहाटे साडेपाचच्या सुमारास शेनाळे परिसरात पोहोचली असता हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर विखुरलेल्या खडी व रेतीमुळे बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस अचानक रस्त्याच्या कडेला घसरत दरीकडे कलंडली. या घटनेची माहिती मिळताच शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वनाथ सावंत, तसेच सुनील साळवी, विकी कदम, विवेक वाडकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पुढील प्रवासासाठी रिक्षांची व्यवस्था करून प्रवाशांना मदतही करण्यात आली.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवेकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी खडी, वाळू व अन्य बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकण्यात आले आहे. कालांतराने हे साहित्य रस्त्यावर पसरल्याने वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री अथवा पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावरील या अडथळ्यांचा अंदाज येणे कठीण ठरत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.
मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या अपूर्ण आणि संथ कामांमुळे परिसरातील नागरिक व प्रवासी संतप्त झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवून महामार्गाचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
बस दरीकडे कलंडूनही चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि ग्रामस्थांच्या तत्पर मदतीमुळे सर्व १८ प्रवासी सुखरूप बचावले. मात्र, महामार्गावरील निष्काळजीपणा आणि रखडलेल्या कामांमुळे भविष्यात अधिक गंभीर दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

