(मंडणगड /रत्नागिरी)
दारू पिताना अपेक्षेपेक्षा कमी दारू दिल्याचा राग मनात धरून झोपेत असलेल्या नातेवाईकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात घडली. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी संशयित आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सदू सखाराम मोकाशी (वय ४२, रा. शेनाळे) आणि संशयित प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०, रा. शेनाळे) हे नातेवाईक असून दोघेही एकत्र मजुरीचे काम करत होते. सोमवारी (२९ जून) रात्री दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले. त्यावेळी अपेक्षेपेक्षा कमी दारू दिल्याच्या कारणावरून संशयिताच्या मनात संताप निर्माण झाला. रात्री उशिरा सदू मोकाशी झोपल्यानंतर प्रकाश वाजे याने मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने सदू मोकाशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, गुन्हा केल्यानंतर तो त्याच ठिकाणी शांतपणे झोपून राहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित करण्यात आले. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निर्घृण हत्येमागील सर्व परिस्थिती आणि इतर पैलूंचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

