(मंडणगड / वार्ताहर)
मंडणगड–वेळास मार्गावरील मालेगाव येथील धोकादायक वळणावर आज (6 ऑक्टोबर) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंडणगड–वेळास मार्गावरून एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना मालेगाव येथील वळणावर समोरून एक वाहन आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी संभाव्य धडक टाळण्यासाठी बसचालकाने अचानक ब्रेक लावल्याने बसचा ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला गेली.
त्यानंतर बस रस्त्यालगतच्या गवतावरून घसरत पुढे जाऊन एका कंपाउंडच्या भिंतीवर आदळली. अपघातावेळी बसमध्ये एकूण १२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी तीन प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या समोरील भागाची मोडतोड झाली असून समोरील काच फुटली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाणकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, मालेगाव येथील हे वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.


