( नवी मुंबई )
कोकण रेल्वेच्या निसर्गमय प्रवासाचा, अभियांत्रिकी कौशल्याचा आणि परिवर्तनशील योगदानाचा प्रेक्षकांना नेत्रसुखद अनुभव देणाऱ्या ‘कोकण रेल्वे कॉफी टेबल बुक’ चे अनावरण नुकतेच दिमाखदार समारंभात पार पडले. या अनोख्या प्रकाशन सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, संचालन व व्यावसायिक विभागाचे संचालक सुनील गुप्ता तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर हेही मान्यवर सहभागी झाले होते.
या कॉफी टेबल बुकमध्ये केवळ रेल्वेमार्गाचे तपशील नाहीत, तर कोकण रेल्वेच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष साकारले जाण्यापर्यंतचा धाडसी प्रवास मोहक छायाचित्रे, आकर्षक मांडणी आणि जिवंत वर्णनांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. उंच कडे-कपारी, खोल दऱ्या, वेणवेलासारखे वळणदार मार्ग आणि हिरव्या वनराईतून जाणाऱ्या रेल्वेचे सौंदर्य या पुस्तकात जसेच्या तसे टिपले गेले आहे.
पश्चिम किनारपट्टीच्या विकासाचा मेरूमणी ठरलेल्या कोकण रेल्वेची ओळख या पुस्तकातून नव्याने पटते. ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नसून कोकणच्या सामाजिक-आर्थिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवणारी एक जीवनवाहिनी आहे, हे या प्रकाशनातून अधोरेखित होते. पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अग्रस्थानी असलेल्या या संस्थेचे विविध पैलू पुस्तकात प्रभावीपणे टिपले आहेत.
स्मरणीय क्षणांच्या साक्षीदार ठरलेल्या या समारंभात उपस्थित मान्यवरांनी कोकण रेल्वेच्या भूमिकेचे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाचे मनापासून कौतुक केले. रेल्वेप्रेमींना आणि कोकणच्या चाहत्यांना हे पुस्तक एखाद्या स्मृतिगंधासारखे नक्कीच मनात घर करणारे ठरणार आहे.