( मुंबई )
वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी भारत सरकारने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) अनिवार्य केली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित सर्व नवीन वाहनांवर ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर, आता 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवरही एचएसआरपी बसवणे अनिवार्य करण्यात आले असून, शेवटची तारीख ३० जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत वाहनधारकांनी ही प्लेट बसवून घेतली नाही, तर दंडात्मक कारवाईसह विविध शासकीय सेवांचा लाभ घेणे अडथळाग्रस्त होणार आहे.
एचएसआरपी का गरजेची आहे?
-
बनावट किंवा छेडछाड केलेल्या नंबर प्लेट्समुळे होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण
-
वाहन ओळख अधिक अचूक आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध
-
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची
-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन
एचएसआरपी नसलेल्या वाहनांना काय अडचणी येतील?
१. वाहनाचे मालकी हक्क हस्तांतरण
२. पत्ता बदल किंवा आरसी डुप्लिकेट मिळवणे
३. विमा अद्ययावत करणे
४. फायनान्स बोजा चढवणे/उतरवणे
या सर्व प्रक्रिया तात्पुरत्या स्थगित केल्या जातील.
याशिवाय, एचएसआरपी नसलेल्या किंवा बनावट प्लेट लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
एचएसआरपी बुकिंग कशी कराल?
1. अधिकृत पोर्टलला भेट द्या:
👉 https://hsrpmhzone2.in
किंवा
👉 www.transport.maharashtra.gov.in
2. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) निवडा:
तुमच्या वाहनाच्या नंबरचे पहिले 4 अंक टाकून RTO निवडा.
3. तुमची माहिती भरा:
वाहन क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर इत्यादी तपशील भरावेत.
4. फिटमेंट सेंटर आणि तारीख निवडा:
तुमच्या सोयीच्या दिवशी आणि वेळेसाठी अपॉइंटमेंट ठरवा.
5. शुल्क ऑनलाइन भरा:
रोख व्यवहार टाळावा. ऑनलाइन पद्धतीनेच शुल्क भरणे आवश्यक आहे.
6. निवडलेल्या दिवशी फिटमेंट सेंटरवर जाऊन एचएसआरपी लावून घ्या.
-
ही प्रक्रिया फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच करा. कोणत्याही अनधिकृत एजंटांपासून सावध राहा.
-
एकदा एचएसआरपी बसवल्यानंतर, संबंधित वाहनाचे डिजिटल रेकॉर्ड वाहन डेटाबेसमध्ये अद्ययावत होईल.