(ठाणे / वृत्तसंस्था)
ठाणे शहरातील जोगिला तलावातून आज (शुक्रवारी) सकाळी दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलींमध्ये ७ वर्षीय गंगी उदय कामी आणि ४ वर्षीय आशा गणेश कामी यांचा समावेश असून, दोघी सख्ख्या बहिणी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही मुली ठाणे पश्चिमेकडील आंबेडकर रोड परिसरातील लॉरिस्टँड चाळीत राहत होत्या.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) पथक आणि अग्निशमन दलाचे जवान जोगिला तलाव परिसरात दाखल झाले. बचाव पथकाने शोधमोहीम राबवत शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता तलावातून दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. RDMC चे प्रमुख यासीन तडवी यांनी याबाबत माहिती दिली.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान, दोन्ही मुली जोगिला तलावापर्यंत नेमक्या कशा पोहोचल्या आणि त्या तलावात कधी व कोणत्या परिस्थितीत गेल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या पाण्यात कशा पडल्या आणि त्यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणी राबोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे.


