(सिंधुदूर्ग / दोडामार्ग)
तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवेवरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांपैकी सहा वर्षीय रेगण दिलीप बडा याचा मृतदेह तब्बल २१ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज (मंगळवारी) दुपारी आढळून आला. मात्र, त्याच्यासोबत वाहून गेलेला अनुरंजन किसपोट्टा याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर रेस्क्यू टीम, तालुका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने ही शोधमोहीम राबविण्यात आली.
घोटगेवाडी येथे वास्तव्यास असलेले परप्रांतीय अनुरंजन हे सहा वर्षीय रेगणला सोबत घेऊन काही कामानिमित्त घोटगेवाडीहून कोनाळकट्टा येथे गेले होते. काम आटोपून दोघेही घरी परतत असताना तिलारी नदीवरील कॉजवेवर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे दोघेही नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सायंकाळनंतर अंधार पडल्याने नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. रात्री शोध घेणे शक्य नसल्याने मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, शोधकार्यासाठी तालुका प्रशासनाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
आज सकाळी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोटींच्या साहाय्याने तिलारी नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे २.४५ वाजता घोटगे येथील पुलाजवळ झाडाला अडकलेल्या अवस्थेत रेगणचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर हा मृतदेह मिळाला. रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
रेगण बडा याने याच वर्षी घोटगेवाडी येथील शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घोटगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अनुरंजन किसपोट्टा याचा शोध घेण्यासाठी आज सायंकाळपर्यंत तिलारी नदीच्या कुडासे परिसरात शोधमोहीम सुरू होती. मात्र, अंधार पडल्याने अखेर शोधकार्य थांबविण्यात आले. पुढील टप्प्यात पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. अनुरंजनचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून नदीपात्रातील विविध भागांची तपासणी करण्यात येत आहे.
शोधमोहीम अधिक प्रभावीपणे राबविता यावी आणि नदीतील पाण्याचा प्रवाह कमी राहावा यासाठी तिलारी मुख्य धरण तसेच तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्यातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यामुळे शोधकार्याला काही प्रमाणात मदत झाली. मात्र, धरण आणि बंधाऱ्यातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने मंगळवारी सायंकाळी पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.
या शोधमोहिमेत दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लाईफ जॅकेट परिधान करून रेस्क्यू टीमसोबत तिलारी नदीपात्रात उतरून शोधकार्यात सहभाग घेतला. त्याचदरम्यान घोटगे पुलाजवळ चिमुकल्या रेगणचा मृतदेह आढळून आला. अनुरंजनचा शोध घेण्यासाठी कुडासे नदीच्या दिशेनेही शोध घेण्यात आला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अंधार झाल्याने मंगळवारी सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली.

