(पुणे / पिंपरी-चिंचवड )
पिंपरी-चिंचवड शहरात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाची चाकू आणि चॉपरने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काळेवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव सुभान अमित शेख असे असून त्याचे शहरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र संबंधित तरुणी त्याला सातत्याने नकार देत होती. या संबंधाला तरुणीच्या कुटुंबीयांचाही विरोध होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे पाच महिन्यांपूर्वी संतापाच्या भरात सुभानने संबंधित तरुणीवर चाकूने हल्ला करत तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो तुरुंगात होता. दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच सुभान जामिनावर बाहेर आला होता. तो पुन्हा मुलीला इजा पोहोचवू शकतो, अशी भीती तरुणीच्या आईला वाटत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या परिचयातील विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना याबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे. तसेच “आमच्या मुलीचा नाद सोड, अन्यथा परिणाम गंभीर होतील,” अशी धमकीही सुभानला देण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
रात्री उशिरा चाकू आणि चॉपरने हल्ला
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभान शेख आणि त्याचा साथीदार अर्षद रमजान शेख यांच्यावर अचानक चाकू आणि चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात सुभान गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर, पोटावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे काही तासांतच विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा एकतर्फी प्रेम, महिलांची सुरक्षा आणि वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

