(रत्नागिरी)
शहरातील अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी (१७ जून) दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दिलीप रामचंद्र भोसले (वय ६२, रा. अभ्युदयनगर, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी २०२३ पासून आपल्या बहिणीसह बेघर निवारा केंद्रात निवास घेतला होता. त्यांना गेल्या काही काळापासून पक्षाघाताचा (पॅरालेसिस) त्रास होता, अशी माहिती केंद्राच्या चालक शिवानी संदीप पवार (वय ३९, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांना दिली.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दिलीप भोसले यांची बहीण त्यांना जेवणासाठी उठवण्यासाठी गेली असता, ते कोणतीही हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.