(खेड)
खेड शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून तिचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरण्यास सुरूवात झाली आहे.
सध्या जगबुडी आणि नारंगी या दोन नद्या पूरस्थितीत असून, त्यांच्या पाण्याने खेड शहरातील अनेक अंतर्गत रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सतत लक्ष ठेवून असून खेड नगरपरिषदेकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता नदीकाठच्या रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मदत आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तयारीच्या स्थितीत ठेवली असून, आपत्कालीन उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. गरज पडल्यास स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.