(रत्नागिरी)
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यभरातील ९ क्रीडा प्रबोधिन्यांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी खेळाडूंसाठी सरळ प्रवेश (५०%) आणि कौशल्य चाचणी (५०%) प्रक्रियेअंतर्गत निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी पात्र खेळाडूंनी आपले अर्ज दि. २३ जून २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं. OS-15, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
खेळाडूंनी अर्जासोबत खालील कागदपत्रांची सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे – आधार कार्ड, जन्मप्रमाणपत्र, तसेच राज्य/राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे (मो. ९२८४३४२२१०) यांच्याशी संपर्क साधावा.
क्रीडा प्रबोधिन्यांमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग आदी एकूण १७ क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. संबंधित खेळातील राज्यस्तर पदकविजेते किंवा राष्ट्रीय प्रतिनिधी असलेल्या १९ वर्षांखालील खेळाडूंना तज्ज्ञ समितीसमोर चाचणी घेऊन सरळ प्रवेश दिला जातो, तर राज्यस्तर सहभाग असलेल्या खेळाडूंना कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश दिला जाईल.
प्रवेश प्रक्रियेनंतर निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे. विभागस्तर चाचण्या २५ व २६ जून २०२५ दरम्यान, तर त्यामधून निवड झालेल्या खेळाडूंसाठी राज्यस्तर चाचण्या ५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, काही खेळांसाठी विभागीय चाचणीऐवजी थेट राज्यस्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे, विशेषतः खेळाडूंची संख्या कमी असल्यास. चाचणी दरम्यान खेळाडूंनी स्वतःची निवास व भोजन व्यवस्था स्वतः करणे आवश्यक आहे.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.