(जैतापूर / वार्ताहर)
कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ४ अर्थात रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील आडीवरे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण किंवा पर्यायी बायपास मार्गाची आवश्यकता अधोरेखित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या महामार्गावर नैसर्गिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थाने आणि ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आडीवरे येथे योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह लाखो भाविक आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होऊ शकतो.
रेवस-रेड्डी सागरी महामार्ग हा कोकणातील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ल्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यटन मार्ग ठरत आहे. या महामार्गाच्या परिसरात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध भाटे बीच, गावखडीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा, राजापूर तालुक्यातील विस्तीर्ण कशेळी बीच आणि आंबोळगड बीच यांसारखी आकर्षक पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील दुर्मीळ सूर्यमंदिरांपैकी एक असलेले कशेळी येथील प्रसिद्ध श्री कणकादित्य सूर्यमंदिर, रत्नागिरी तालुक्यातील स्वामी स्वरूपानंद यांची पावनभूमी पावस आणि राजापूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री महाकाली देवस्थान, आडीवरे ही महत्त्वाची धार्मिक स्थळे याच मार्गावर येतात.
या पर्यटनस्थळांसोबतच समुद्राच्या मुखाशी उभा असलेला ऐतिहासिक किल्ले पूर्णगड, राजापूरमधील किल्ले आंबोळगड आणि किल्ले यशवंतगड यांनाही या महामार्गामुळे पर्यटकांना भेट देणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे या मार्गाचे महत्त्व केवळ दळणवळणापुरते मर्यादित न राहता पर्यटन आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीनेही वाढले आहे.
या मार्गावर वर्षभर पर्यटक आणि भाविकांची वर्दळ असते. विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात तसेच आडीवरे येथील श्री महाकाली मंदिराच्या दहा दिवसांच्या नवरात्रोत्सवात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, आडीवरे परिसरातील रस्ता अरुंद असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा फटका लांब पल्ल्याच्या वाहनांना बसण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होतो.
ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आडीवरे येथील रस्त्याचे रुंदीकरण करणे किंवा गावाला वळसा घालून जाणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग उभारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. बायपास मार्ग उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड तसेच वेगवान वाहनांना गावातील वाहतुकीत अडकून न पडता पुढे जाता येईल. परिणामी, आडीवरे बाजारपेठ आणि मंदिर परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
रस्ता रुंदीकरण किंवा पर्यायी मार्गामुळे स्थानिक व्यापारी, पायी प्रवास करणारे भाविक आणि नागरिकांना अधिक सुरक्षितपणे वावरता येईल. तसेच प्रवासाचा वेळ वाचण्यास आणि कोकणातील सागरी व ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आडीवरे परिसराचे भौगोलिक स्वरूप, वाढती वाहतूक आणि पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि विनाअडथळा होण्यासाठी रस्ता रुंदीकरण अथवा बायपासच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.


