(गणपतीपुळे / वैभव पवार)
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे ‘नवदुर्गांना वंदन’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ‘नऊ दिवस, नऊ महान स्त्रिया’ या संकल्पनेतून विद्यार्थिनींनी भारतीय इतिहास, समाजसुधारणा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, समाजसेवा, राजकारण आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महान स्त्रियांच्या भूमिका साकारल्या. एकपात्री अभिनयातून या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती सादर करत विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकली.
या उपक्रमात राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले, रमाई आंबेडकर, अनुताई वाघ, इंदिरा गांधी, सिंधुताई सपकाळ आणि कल्पना चावला या नऊ महान स्त्रियांच्या कार्याला कृतीयुक्त अभिनयातून अभिवादन करण्यात आले. या भूमिका अनुक्रमे तन्वी नितीन कुर्टे, श्रावणी उदय रहाटे, आराध्या विकास रहाटे, रिद्धी अजित कुर्टे, परी विश्वनाथ कुर्टे, निधी सागर घवाळी, समिता सचिन तांबटकर, सिद्धी अजित कुर्टे आणि त्रिषा हेमंत धनावडे यांनी साकारल्या.
या उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सविता रमेश तोटावार आणि वाटद केंद्रप्रमुख श्रीम. मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे आणि शिक्षिका श्रीम. पुनम चंद्रकांत कुलकर्णी यांनी उपक्रमाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष श्री. आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निकिता नितीन कुर्टे, उपाध्यक्ष श्री. सागर घवाळी, श्री. रमेश तांबटकर, श्री. उदय रहाटे, श्री. विश्वनाथ शिर्के, अंगणवाडी सेविका सौ. सुजाता लोहार, मदतनीस सौ. समीक्षा भास्कर घवाळी आणि शालेय पोषण आहार कर्मचारी सौ. अक्षरा विश्वनाथ शिर्के यांनी सहकार्य केले. विद्यार्थिनींची तयारी, वेशभूषा आणि भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी पालकांनीही मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, स्त्रीशक्तीविषयी आदर निर्माण करणे, सामाजिक जाणीव विकसित करणे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे यांनी सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे यांनी स्पष्ट केले. महान स्त्रियांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी शाळेने केलेला हा स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उदय रहाटे यांनी व्यक्त केली.
‘नवदुर्गांना वंदन’ या उपक्रमातून विद्यार्थिनींना महान स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द, धैर्य, त्याग, समाजसेवा आणि कर्तृत्व यांची प्रेरणा मिळाली. नवरात्रोत्सव केवळ देवीपूजनापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी आदर्श कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या विचारांचे स्मरण आणि अनुकरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थिनींना मिळाली. त्यामुळे शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


