( खेड )
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड–दापोली राज्य मार्गावर खेड शहराजवळ योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनार कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक कुटुंब दापोली तालुक्यातील दाभोळ येथे फिरण्यासाठी वॅगनार कारने जात होते. खेड शहराजवळील योगिता डेंटल कॉलेज शेजारी त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीशी जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात गेली.
दरम्यान, वॅगनार कार पुलाच्या संरक्षण कठड्याला अडकून राहिल्याने ती पलटी होण्यापासून वाचली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि मार्गाने जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी खेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कारमध्ये चालकासह लहान मुलासह चार प्रवासी होते. अपघातात सर्वजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ खेड–दापोली मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

