( रत्नागिरी / वार्ताहर )
मराठा आरमाराचा देदीप्यमान सागरी वारसा, युवाशक्ती आणि लष्करी शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी (रत्नागिरी) आयोजित ‘मेन्यू २७’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेला अल्ट्राटेक जेटी येथून उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या हस्ते, तर २ महाराष्ट्र नवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून नौकांचा ताफा रवाना करण्यात आला. या वेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, जिल्हा प्रशासन, पोर्ट ऑफिस आणि सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान रोलिंग ट्रॉफीअंतर्गत ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट’ या राष्ट्रीय स्पर्धेचा भाग म्हणून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेले ६० उत्कृष्ट नौदल कॅडेट्स सहभागी झाले असून, त्यात ३५ युवती आणि २५ युवकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात या कॅडेट्सनी सागरी नेव्हिगेशन, बोट पुलिंग, रिगिंग आणि आपत्कालीन बचावकार्याचे खडतर प्रशिक्षण घेतले आहे.
प्रशिक्षणानंतर हे कॅडेट्स २७ फूट लांबीच्या तीन डीके व्हेलर नौकांमधून रत्नागिरी ते पालशेत आणि पुन्हा रत्नागिरी असा एकूण २५० किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणार आहेत. या मोहिमेदरम्यान तिवरी, जयगड, बोरिया आणि पालशेत येथे नौकांचा मुक्काम असेल.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमाराच्या शौर्याला अभिवादन करणाऱ्या या मोहिमेसाठी ‘कोकण ज्ञान तरंग’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून, ‘ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा’ हे ब्रीदवाक्य देण्यात आले आहे. सागरी प्रवासासोबतच किनारपट्टीवरील गावांमध्ये तटीय सुरक्षा, सागरी प्रदूषण आणि समुद्र स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी कॅडेट्स रॅली आणि पथनाट्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत हे संदेश पोहोचवणार आहेत.
मोहिमेदरम्यान कॅडेट्सच्या सुरक्षेसाठी तीन विशेष बचाव नौका ताफ्यासोबत तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच वेस्टर्न नवल कमांड, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी, एमआरसीसी मुंबई आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य या मोहिमेला लाभले आहे.
युवकांमध्ये नेतृत्वगुण, साहस आणि शिस्त विकसित करण्याबरोबरच कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कॅडेट्स या उपक्रमातून किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतील, असा विश्वास यावेळी उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


