(खेड /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मोरवंडे बोरज येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एक अल्टो कार सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. गणपतीपुळे येथे दर्शन करून ठाण्याकडे परतणाऱ्या एका कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये सिद्धी नाईक (२९), रिद्धी नाईक (२९), स्नेहल नाईक (५८), सिद्धेश नाईक (६५) आणि तेजस बोरकर (३१) यांचा समावेश आहे. हे सर्वजण ठाणे येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अल्टो कार (एमएच ०४ केडी ६१२८) ही गणपतीपुळे येथून मुंबई-ठाण्याच्या दिशेने रवाना झाली होती. रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास मोरवंडे बोरज येथील सुरभी हॉटेलसमोर वाहन पोहोचले असता चालकाचे नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक गाय आल्याने चालक गोंधळला आणि वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींना त्वरित मदत मिळाली.
घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधामची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी प्रसंगावधान राखत दरीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. गणपती दर्शन आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

