(रत्नागिरी / वार्ताहर)
काळाबादेवी येथील श्री देव रामेश्वर आणि श्री देवी कालिका माता नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून युवती सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काळाबादेवी यांच्या वतीने शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित भव्य ढोल-ताशा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील विविध नामांकित पथकांनी सहभाग घेत आपल्या दमदार वादनाने परिसर दणाणून सोडला. नाचणे येथील ‘शिवगर्जना ढोल पथका’ने प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली. या कार्यक्रमाचे आयोजन युवती सेना विभाग अधिकारी सौ. दिव्या सुर्वे यांनी केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. संदेश नारगुडे, शिवसेना विभागप्रमुख श्री. महेश नेवरेकर, युवासेना उपविभाग अधिकारी कु. आराध्य नेवरेकर, श्री. सुहास जोशी आणि श्री. सुनील बोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विभूती जोशी यांनी केले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून युवती सेनेच्या वतीने स्थानिक महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पारंपरिक वेशभूषा आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली. अटीतटीच्या लढतीत नाचणे येथील ‘शिवगर्जना ढोल पथका’ने प्रथम क्रमांक पटकावत ७ हजार ७७७ रुपये रोख आणि भव्य चषक मिळवला. आंबेशेत येथील ‘नवलाई पावणाई जाकादेवी संघा’ने द्वितीय क्रमांकासह ५ हजार ५५५ रुपये आणि भव्य चषक, तर चिंचखरी येथील ‘श्री सांब रवळनाथ पथका’ने तृतीय क्रमांकासह ३ हजार ३३३ रुपये आणि भव्य चषक पटकावला.
स्पर्धेत उत्कृष्ट ढोलवादक म्हणून भाटीमिऱ्या येथील महापुरुष संघाचा कु. अथर्व मयेकर, तर उत्कृष्ट ताशावादक म्हणून आंबेशेत येथील नवलाई पावणाई जाकादेवी संघाचा कु. स्मित बोरकर यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सांगता समारंभात शिवसेना विभागप्रमुख श्री. महेश नेवरेकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके आणि भव्य चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांतील स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देण्यात आली.
मालगुंडकर वाडी, दत्त मंदिराजवळ, काळाबादेवी येथे झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळाबादेवी शाखाप्रमुख श्री. अजिंक्य सुर्वे, कु. रणजितसिंह मालगुंडकर, कु. निमिष मयेकर, कु. करण निवेंडकर, कु. गुरू कोलगे, कु. सिद्धांत मयेकर आणि कु. विराज मालगुंडकर यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला ढोल-ताशाप्रेमी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.


