(खेड)
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धन आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डायटमधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुकास्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा नवभारत हायस्कूल, भरणेनाका, खेड येथे पार पडली. या स्पर्धेत सवेणी क्र. 1 शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. एकनाथ आनंदराव पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत त्यांनी ‘नटसम्राट’मधील एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. त्यांच्या सादरीकरणातील उत्कट भावनिकता, प्रभावी संवादफेक आणि जीवंत अभिनयामुळे प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले. प्रयोग इतका हृदयस्पर्शी होता की सभागृहातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या अद्वितीय अभिनयामुळे त्यांची जिल्हास्तरीय नाट्य अभिनय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचे शैक्षणिक क्षेत्रासह नाट्यक्षेत्रातील अनेकांनी कौतुक केले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल श्री. एकनाथ आनंदराव पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

