(मुंबई)
नाशिक शहरात अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नायना घोलप, माजी नगरसेवक दिलीप दातीर आदी अनेक स्थानिक नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
बडगुजर म्हणाले, “वरिष्ठांचा आदेश अंतिम”
पक्षप्रवेशानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले, वरिष्ठांचा जो आदेश असेल, त्याप्रमाणे मी काम करीन. त्यांच्या आदेशाचे पूर्ण पालन करेन, माझ्या प्रवेशास स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध नसून केवळ नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्याकडून विरोध होता, असे बडगुजर यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला असून प्रवेशानंतर विरोध करणाऱ्यांची भूमिका बदलेल, असा दावा देखील बडगुजर यांनी यावेळी केला.
दरम्यान, बबनराव घोलप यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशामागची भावना स्पष्ट करत, “बडगुजर यांचा पूर्वीच्या पक्षात अपमान झाला, म्हणून मीही भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला,” असे सांगितले. “मागच्या पक्षात वरिष्ठांचा मानसन्मान ठेवला जात नव्हता,” असा टोलाही त्यांनी लगावला.
पक्षात स्वागत… पण विरोधही कायम
सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशामुळे नाशिकच्या स्थानिक भाजप गोटात मात्र नाराजीचा सूर आहे. पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसल्याने अनेक स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अंधारात राहिले होते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेक माजी नगरसेवकांनी तर बडगुजर यांच्या प्रवेशाला स्पष्ट विरोध दर्शवला होता. भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी, “पक्ष वाढीसाठी बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत आहे; मात्र ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होईल, अशा व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये,” अशी ठाम भूमिका घेतली होती.
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे प्रश्नचिन्ह?
सुधाकर बडगुजर यांच्यावर २९ गुन्हे दाखल असून, एका प्रकरणात त्यांना दीड वर्ष कारावासाची शिक्षाही झाली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात केलेल्या कथित विधानांमुळे आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेतील त्यांच्या भूमिकेमुळेही वाद निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर, भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला विरोध नोंदवला होता. त्यावेळी, “बडगुजर यांचा प्रवेश झाल्यास पक्षाची प्रतिमा डागळेल आणि महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल,” अशी स्पष्ट सूचना दिली होती.
राजकीय चर्चांना उधाण
सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश म्हणजे नाशिकच्या राजकारणात एक नवा वळणबिंदू मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश किती प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.