(मुंबई)
मुंबईतील विरार मधून थरकाप उडवणारी घटना समोर आली होती. मुंडकं कापून धड गोणीत भरून, नाल्यात फेकलेल्या उत्पला हिप्परगी या महिलेचा मृतदेह शोधण्यात मांडवी पोलिसांना यश आले आहे. या महिलेचं मुंडकं होळीच्या दिवशी एका सुटकेसमध्ये आढळून आलं होतं. पिरकुंडा दर्ग्याजवळ ही सुटकेस पोलिसांना सापडली होती. १३ मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगेत महिलेचं मुंडकं सापडलं होतं. दरम्यान, एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटामुळे या हत्येचा उलगडा झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं होत. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांना या तपासात यश आलं आहे. त्यानंतर महिलेच्या पतीलाच पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पती पत्नीच्या झालेल्या कौटुंबिक वादातून पतीनेच राहत्या घरात गळा दाबून पत्नीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विरारच्या देशमुख फार्म हाऊसजवळ आणला. तेथे मुंडकं कापून धड वेगळं केलं. त्यानंतर आरोपी पतीने मुंडकं नसलेलं धड एका गोणीत भरून मोठ्या नाल्यात फेकून दिलं. त्यांतर आरोपी पती फरार झाला. पोलिसांना मुंडकं मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली होती.
मंगळवारी सकाळपासून मांडवी पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. हा नाला मोठा असल्याने महिलेचे धड सापडणे कठीण वाटत होते. पोलिसांनी आरोपी हरिष हिप्परगी याला देखील घटनास्थळी आणले होते. त्याने नेमकी जागा दाखवली. सुमार ४ तासांच्या शोध मोहिमेनंतर तिचे धड आढळले. पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतेले. हे धड कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विरारपूर्व, विरार-नालासोपारा लिंक रोडजवळील देशमुख फार्म हाऊस जवळीच्या नाल्यात मंगळवार (18 मार्च) सकाळी मुंडकं नसलेले धड शोधण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी पतीला अटक केली आहे.
उत्पला हिप्परगी ही महिला मुळची पश्चिम बंगालच्या नैहाटी गावात राहणारी होती. २५ वर्षांपूर्वी ती पती आणि मुलाला सोडून मुंबईला आली होती. त्यानंतर एका बार मध्ये ती काम करत होती. त्या बारमध्ये काम करणार्या हरिश हिप्परगी याच्याबरोबर तिची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न केले. १२ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. हे दोघे प्रेमविवाहानंतर नालासोपारा पूर्वमधील रहेमत नगर येथे रुम भाड्याने घेऊन राहत होते. लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते. हरिश एका बार मध्ये काम करत होता. दरम्यान बार बंद झाल्यानंतर हरिशने इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आणि ते सर्व मुंबई सोडून नालासोपारा येथे राहण्यासाठी आले. त्यांना २२ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद वाढले. त्यामुळे उत्पला सारखी गावी जात होती आणि ४-४ महिने गावी मुक्काम करायची. ती मुलाला घेऊन सोडून जाण्याचीही धमकी देत होती. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. अखेर ८ जानेवारीच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि हरिशने गळा आवळून तिची हत्या केली.