( मुंबई )
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आणि मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गुरुवारी प्रकाश महाजन यांनी शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
प्रकाश महाजन हे मनसेमध्ये दीर्घकाळ सक्रिय होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून अपेक्षित संधी न मिळाल्याने आणि सतत उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी समाजमाध्यमांवर आपला निर्णय जाहीर केला होता. कोणत्याही पक्षात राहिलो तरी निवडणुकीचे तिकीट मिळत नव्हते, मात्र हिंदुत्वाचा विचार जपण्यासाठी आपण राजकारणात सक्रिय होतो, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज अधिकृतपणे ते शिंदेसेनेत दाखल होणार आहेत.
राजकारणाचा मोठा अनुभव असलेले प्रकाश महाजन शिंदे गटासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना पक्षात एखादे महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. भाजपप्रमाणेच आता शिवसेना शिंदे गटातही इनकमिंग वाढताना दिसत असून आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे.

