( मुंबई )
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणींमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ व फोटो सापडल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात धक्कादायक माहिती प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये एकूण 1749 व्हिडिओ आणि फोटो आढळले असून, त्यापैकी 234 अश्लील फोटो आणि 19 अत्यंत अश्लील व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. या व्हिडिओंमध्ये मोलकरीण महिलांचे अत्यंत लज्जास्पद अवस्थेतील व्हिडिओ असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले. तसेच, विवस्त्र मुलींचे व्हिडिओ, नशा आणि लैंगिक अत्याचाराच्या क्लिप्स असल्याचा दावा करत, चाकणकर यांनी हे प्रकरण मानवी तस्करीचे रूप घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रेव्ह पार्टीच्या धागेदोऱ्यांचा मानवी तस्करीशी संबंध?
प्रांजल खेवलकर यांनी पुण्यात आयोजित केलेली रेव्ह पार्टी फक्त मौजमजेपुरती मर्यादित नसून, त्या पार्टीचे धागेदोरे थेट मानवी तस्करीशी जोडले जात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट चाकणकर यांनी केला. “सिनेमात संधी देण्याचे आमिष दाखवून” मुलींना लोणावळा, गोवा, साकीनाका, जळगाव इत्यादी ठिकाणी बोलावले गेले. या मुलींना पार्टीमध्ये अमली पदार्थ आणि गांजा देण्यात आला. काही मुली गेल्या दोन वर्षांपासून या नेटवर्कमध्ये अडकलेल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मला रोहिणी खडसे यांच्याबद्दल सहानुभूती वाटते,” असेही चाकणकर यांनी या प्रकरणात म्हटले.

एकनाथ खडसे यांचा पलटवार : “हे बदनाम करण्याचे षड्यंत्र”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर पलटवार केला. “पोलिसांकडून आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चाकणकरांकडे कोणते पुरावे आहेत? त्यांनी स्वतः काही पाहिले आहे का?” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. “पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करायला हवे होते. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही. परंतु, वारंवार यामध्ये हस्तक्षेप करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
खडसे यांनी आणखी स्पष्ट केले की, “२०० व्हिडिओ असोत किंवा ५००, मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. परंतु या सर्व अफवा आहेत, आणि हे आमचं बदनामीचं षड्यंत्र आहे.” तसेच, “आजपर्यंत या प्रकरणी एकाही मुलीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली नाही,” असा दावाही खडसे यांनी केला.

