(संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या चित्र-शिल्प महाविद्यालयास नुकतीच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांची अधिकृत संलग्नता प्राप्त झाली आहे. या संलग्नतेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
याअंतर्गत, संस्थेतील चित्रकला (Painting) व शिल्पकला (Sculpture) हे दोन्ही विभाग पूर्वी चार वर्षांचे असताना आता ते तीन वर्षांचे करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अभ्यासक्रम अधिक संक्षिप्त, प्रभावी आणि व्यावहारिक कौशल्यावर आधारित होणार असल्याचे संस्थेचे प्राचार्य प्रा. माणिक यादव यांनी सांगितले.
यासोबतच, यापूर्वी केवळ मूलभूत अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येत होता. मात्र आता नव्या प्रणालीनुसार, १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही चित्रकला व शिल्पकला विभागात थेट प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे लहान वयातच कलाक्षेत्रात करिअर घडवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मूलभूत अभ्यासक्रम या १ वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स साठी ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे. तसेच हौशी कलाकार यांच्यासाठी हा कोर्स ठेवण्यात आलेला आहे.
तसेच बारावी वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कलाशिक्षक पदविका या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन कलाशिक्षक होण्याची सुवर्णं संधी देखील घेता येणार आहे.शासनाच्या नविन धोरणानुसार कला शिक्षक पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळेत अंशकालीन तत्त्वावर नोकरी करता येणार आहे.
अभ्यासक्रमात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत अमलात असलेली वार्षिक परीक्षा पद्धत रद्द करून, दर सहामाहीस मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसंगत व सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करता येईल.
या बदलांमुळे कोकणातील कला शिक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा संचारली असून, विद्यार्थी, पालक आणि कलाजगताकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टने नवे शैक्षणिक पर्व सुरू करत असताना, कोकणातील तरुण कलारसिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.