(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या दुरुस्ती आणि मयूरबाग ते नांदळज या मुख्य रस्त्याच्या उर्वरित दुरुस्तीच्या मागण्यांसाठी सुरू असलेले ग्रामस्थ व पालकांचे आंदोलन अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे व आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आले आहे.
शिवणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, चार वर्गांसाठी केवळ दोनच वर्गखोल्या उपलब्ध असून शाळेची सुमारे ७५ वर्षे जुनी इमारत अत्यंत जर्जर स्थितीत होती. ग्रामस्थ व पालकांनी नूतन इमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केवळ एका खोलीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. उर्वरित दुसऱ्या खोलीसाठी निधी न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
या शाळेच्या समस्येसोबतच मयूरबाग ते नांदळज या सुमारे ६ कि.मी. रस्त्याच्या दुरवस्थेवरूनही ग्रामस्थ नाराज होते. यापैकी साडेतीन कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित अडीच कि.मी.चा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी सरपंच राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला.
११ जून रोजी देवरुख तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने शाळेसंदर्भात आणि बांधकाम विभागाने रस्त्यासंदर्भात सकारात्मक लेखी आश्वासन दिले. तसेच आमदार शेखर निकम यांनी मध्यस्थी करत पुढील कार्यवाहीसाठी विश्वास दिल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
या आंदोलनास माजी आमदार व मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, शिवसेना (उबाठा गट)चे बोरूरकर, माजी सभापती छोट्या गवाणकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा दिला.
ग्रामस्थांच्या संघर्षामुळे प्रशासन हलले, या यशस्वी आंदोलनाची नोंद शिवणेच्या ग्रामविकासाच्या इतिहासात ठळक ठरणारी आहे.