(देवळे / प्रकाश चाळके)
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वेळेत मिळावेत, यासाठी शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वीच तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी धावपळ करत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले. मात्र, यासाठी शिक्षकांनी केलेल्या खर्चाची संपूर्ण रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शिक्षकांना पैशांच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे.
शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी ३०० रुपये खर्च करण्यात आला. त्यापैकी २४० रुपये शासनाकडून जमा झाले असून, उर्वरित ६० रुपये अद्याप मिळालेले नाहीत. ही रक्कम काही दिवसांत जमा होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, बूट आणि पायमोज्यांसाठी खर्च केलेले १७० रुपये अद्याप मिळालेले नसल्याने शिक्षकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
गणवेशाचे पैसे येतील, पण बूट-मोज्यांचे काय?
गणवेश वाटपाची मुदत पाळण्यासाठी शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी तातडीने खर्च केला. शासनाच्या नियमानुसार गणवेशाच्या कापडात ७० ते ८० टक्के पॉलिस्टर आणि २० ते ३० टक्के कॉटन असणे आवश्यक आहे. या निकषांचे पालन करून विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. मात्र, गणवेशाच्या एकूण ३०० रुपयांपैकी २४० रुपयेच जमा झाले असून, उर्वरित ६० रुपयांसाठी शिक्षकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गणवेशाचे पैसे काही दिवसांत मिळण्याची शक्यता असली, तरी बूट आणि पायमोज्यांसाठी खर्च केलेली रक्कम कधी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही. विद्यार्थ्यांनी हे बूट आणि मोजे शाळा सुरू झाल्यापासून वापरण्यास सुरुवात केली, त्यातील काही बूट अर्धवट झिजलेही मात्र, त्यासाठी खर्च केलेले पैसे अद्याप मिळालेले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
शासनाचे आदेश तातडीचे, पण निधीसाठी कमालीची प्रतीक्षा
शासनाकडून नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जातात. मात्र, त्यासाठी शिक्षकांनी केलेल्या खर्चाची रक्कम वेळेत मिळत नसल्याची वाईट स्थिती असल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक भरती आणि बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी केलेल्या खर्चाची देयके प्रलंबित असल्याचा मुद्दाही चर्चेत आहे.
विद्यार्थ्यांनी गणवेश पाच महिने वापरल्याने ते आता जुने होऊ लागले आहेत. बूट आणि पायमोजेही झिजत असताना त्यासाठी खर्च केलेली रक्कम कधी जमा होणार, याची आता शिक्षकांना प्रतीक्षा आहे. गणवेशाच्या उर्वरित ६० रुपयांप्रमाणेच बूट-मोज्यांचे १७० रुपयेही लवकर मिळतील का? ते बेभरवशी असेच सोडून द्यायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाचे आदेश तंतोतंत पाळण्यासाठी शिक्षकांनी आधी स्वतःच्या खिशातून खर्च करायचा आणि त्यानंतर परताव्यासाठी प्रतीक्षा करायची, अशी परिस्थिती योग्य नसल्याची चर्चा शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांना केलेल्या त्या खर्चाची रक्कम वेळेत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


