(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-करजुवे मार्गावरील बागवानी कोंड येथे पट्टेरी वाघ दिसल्याचा दावा करणारा फोटो दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या फोटोच्या आधारे प्रसारमाध्यमांतूनही पट्टेरी वाघाच्या दर्शनाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वनविभागाने केलेल्या चौकशीत या प्रकरणाचे वेगळेच वास्तव समोर आले आहे. संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हा फोटो प्रत्यक्ष वाघाचा नसून एआयच्या माध्यमातून तयार केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे दिवसभर चर्चेत असलेल्या कथित वाघ दर्शनाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.
या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, प्रसारमाध्यमांतून बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वीच व्हायरल फोटोच्या सत्यतेबाबत संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी ऋतिक काजरेकर याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी आपण कॉलेजला जाण्यासाठी निघालो असताना डिंगणी रस्त्यावरील बागवानी कोंड येथे प्रत्यक्ष पट्टेरी वाघ पाहिल्याचे त्याने सांगितले होते. तसेच वाघाचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपल्याचा दावाही त्याने केला होता.
फोटो एआयच्या माध्यमातून तयार केला असेल किंवा प्रत्यक्षात अशी घटना घडलीच नसेल, तर तसे स्पष्टपणे सांगावे, असे संबंधित विद्यार्थ्याला त्यावेळी बजावण्यात आले होते. खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचे परिणाम आणि संभाव्य कारवाई याचीही त्याला कल्पना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आपण प्रत्यक्ष वाघ पाहिला असून फोटो अस्सल असल्याचा दावा त्याने कायम ठेवला. त्याने दिलेल्या माहितीनुसार उपलब्ध तपशीलांच्या आधारे ही बातमी प्रसारित करण्यात आली. बातमी प्रसिद्ध होताच डिंगणीसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात या कथित वाघ दर्शनाची जोरदार चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या घटनेची वनविभागाचे वनपाल सागर गोसावी यांनी गंभीर दखल घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर थेट विश्वास न ठेवता त्यांनी त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याची चौकशी केली. सुरुवातीला ऋतिक काजरेकर याने वनविभागाच्या चौकशीतही प्रत्यक्ष वाघ पाहिल्याचे सांगितले. मात्र, खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव करून देत वनपाल गोसावी यांनी त्याला सविस्तर समज दिली. त्यानंतर विद्यार्थ्याने अखेर आपली चूक मान्य केली. व्हायरल झालेला पट्टेरी वाघाचा फोटो एआयच्या माध्यमातून तयार केल्याचे त्याने कबूल केले. भविष्यात अशा प्रकारे चुकीची माहिती किंवा बनावट फोटो तयार करून प्रसारित करणार नसल्याचेही त्याने मान्य केले.
एका बनावट फोटोमुळे नागरिकांमध्ये भीती
डिंगणी परिसरात यापूर्वी बिबट्या आणि गवे रेड्यांचा वावर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पट्टेरी वाघाचा फोटो समोर आल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. विशेषतः भातकापणीचा हंगाम सुरू असताना शेतात जाणारे शेतकरी, महिला, शेतमजूर, विद्यार्थी आणि वाहनचालक यांच्यामध्ये या बातमीमुळे संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती.
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेला फोटो प्रत्यक्ष घटनेचा असल्याप्रमाणे प्रसारित केल्यास त्याचे सामाजिक परिणाम किती गंभीर असू शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात प्रसारमाध्यमांनीही फोटोची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित विद्यार्थ्याने सुरुवातीला दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला.
वनपाल सागर गोसावी यांच्या चौकशीत विद्यार्थ्याने फोटो एआय जनरेटेड असल्याची कबुली दिल्यानंतर डिंगणीतील कथित पट्टेरी वाघ दर्शनाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एका बनावट फोटोमुळे दिवसभर संपूर्ण तालुक्यात निर्माण झालेली खळबळ आणि त्यानंतर समोर आलेले वास्तव हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे.
वनपाल सागर गोसावी यांचे नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे वनपाल सागर गोसावी यांनी नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा विनोद करण्याच्या उद्देशाने वन्यप्राण्यांचे बनावट फोटो, व्हिडिओ अथवा एआयच्या माध्यमातून तयार केलेली दृश्ये खरी असल्याचे भासवून प्रसारित करू नयेत. अशा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः ग्रामीण भागात अशा अफवांमुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी, शेतमजूर आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरून जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. एखाद्या परिसरात वाघ, बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी दिसल्याची माहिती मिळाल्यास तिची खातरजमा केल्याशिवाय संबंधित फोटो किंवा व्हिडिओ पुढे पाठवू नयेत. जाणीवपूर्वक बनावट माहिती प्रसारित करून सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची बाब प्रशासन गांभीर्याने घेणार असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर लागू कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
वन्यप्राण्यांच्या वावराबाबत काही माहिती मिळाल्यास थेट वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपाल सागर गोसावी यांनी केले आहे.


