(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरीकर रसिकांसाठी दोन दिवसांची नाट्यमेजवानी आयोजित करण्यात आली आहे. सहयोग रत्नागिरी आणि गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात अनुक्रमे ‘सह्याद्रीला जेव्हा जाग येते’ आणि ‘नटसम्राट’ या दोन नाटकांचे प्रयोग सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर होणार आहेत. यावेळी रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती सहयोग रत्नागिरीच्या सचिव मनिषा बामणे आणि खजिनदार अनुजा पेठकर यांनी दिली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘सह्याद्रीला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग होणार आहे. श्री देवी रामायसती कुंभारजुवा गोवा ही संस्था हे नाटक सादर करणार आहे. या कार्यक्रमात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, उद्योजक गणेश धुरी, डॉ. शहाणे आणि सहयोगचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, १ नोव्हेंबर रोजी ‘नटसम्राट’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. साई पुर्वा आर्टस् गोवा ही संस्था या नाटकाचे सादरीकरण करणार आहे. यावेळी युवा उद्योजक अमेय वीरकर, ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे, प्रेमानंद कलशांवकर, दादू पार्सेकर, जयंत नाटेकर आणि भालचंद्र उसगांवकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
दोन्ही नाट्यप्रयोग रसिकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिकांसाठी दत्ता केळकर (मो. 94200 51286) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


