(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील पाचल येथील पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या परिसरात आज (शुक्रवारी, ३० ऑक्टोबर) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांचा वावर आढळल्याची माहिती मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पाचल येथील एका ग्रामस्थालाही याच परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्यामुळे या भागात बिबट्यांचा नियमित वावर असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी सागरे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देत सतर्क केले. तसेच ग्रामपंचायत पाचलच्या माध्यमातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारनंतर घटनास्थळी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सांगितले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत वनविभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार, सदस्य विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, लिपिक कल्पेश सुतार, शिपाई नंदू पांचाळ तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


