(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज शुक्रवारी तूरळ येथे आणखी एक भीषण अपघात घडला. दुपारी पावणे बाराच्या सुमारास गणपती मंदिराजवळ भरधाव वेगातील टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
एमएच १३ डी ०६८०३ क्रमांकाचा टेम्पो टीएन ८८ एल १६३१ क्रमांकाच्या कंटेनरवर आदळल्यानंतर महामार्गावर पलटी झाला. धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. चालक रितेश पाटील (रा. कोल्हापूर) हा रक्ताच्या थारोळ्यात केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघातस्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पसरल्याने उपस्थित नागरिक हादरून गेले.
घटनेची माहिती मिळताच राजवाडी येथील सचिन सुर्वे यांनी पत्रकार मिलिंद चव्हाण यांना कळवले. त्यानंतर मिलिंद चव्हाण यांनी सहकारी आणि रिक्षा व्यावसायिक राजेंद्र भोजने, उदय चव्हाण, दत्ताराम उजगावकर, दिनेश निवळेकर, सचिन हरेकर, जयदीप फडकले आणि शैलेश फडकले यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले.
मिलिंद चव्हाण यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून जखमी चालकाला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रमीज यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, महामार्ग पोलीस पथकातील रियाज मुजावर, सोमनाथ आव्हाड आणि बळीराम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
मुंबई-गोवा महामार्गावरील तूरळ परिसरात गेल्या काही दिवसांत अपघातांची मालिका सुरूच आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी खासगी बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्याचप्रमाणे तळेकांटे परिसरातही दोन वाहनांचा अपघात घडला होता.
आरवली ते तळेकांटे या पट्ट्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या या भीषण अपघातांमुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून सुरक्षाविषयक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


