(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महावितरणच्या ढिसाळ आणि गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा हातावर पोट असणाऱ्या कंत्राटी कामगारांना बसला आहे. रत्नागिरी तालुक्यात वीजेच्या खांबावर काम करत असताना दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन कंत्राटी कर्मचारी खांबावरून कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अविनाश निवृत्त मारकवाड (३४) आणि अजय कृष्णा कांबळे (रा. कोतवडे बौद्धवाडी, रत्नागिरी) अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातील अजय कांबळे याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. या दुर्घटनांमुळे महावितरणच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्यांच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत.
पहिली घटना २७ ऑक्टोबर रोजी कोतवडे सनगरेवाडी येथे घडली. अजय कांबळे हा तरुण वीजेच्या खांबावर चढून तांत्रिक काम करत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काम सुरू करण्यापूर्वी संबंधित लाईन बंद (परमिट) करण्यात आली होती. असे असतानाही अजय याला खांबावर अचानक वीजेचा जोरदार धक्का (शॉक) बसला आणि तो थेट खाली कोसळला. जर लाईन बंद होती, तर वीजप्रवाह आला कुठून? निष्पाप कामगाराचा जीव धोक्यात घालणारा हा गंभीर हलगर्जीपणा नेमका कोणाचा? असे संतप्त सवाल आता उपस्थित केले जात आहेत. अजयला गंभीर दुखापत झाल्याने प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला तात्काळ कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
दुसरी घटना निवळी बौद्धवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. महावितरणचा कंत्राटी कामगार अविनाश मारकवाड हा खांबावर चढून काम करत होता. काम आटोपून खाली उतरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अविनाश नेमका कशामुळे कोसळला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी कंत्राटी कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने दिली जातात का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचा बळी जाण्याची किंवा ते कायमचे अपंग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी राजीवडा निवखोल येथे अशाच प्रकारे वीजेचा धक्का लागून एका निष्पाप कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. तर गणपतीपुळे येथेही सुरक्षा वाऱ्यावर सोडल्यामुळे अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. या जुन्या घटनांमधून महावितरणने कोणताही धडा घेतलेला नाही, हेच या ताज्या दुर्घटनांवरून स्पष्ट होते. कंत्राटी कामगारांकडून जीवावर उदार होऊन काम करून घेतले जाते, मात्र त्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी महावितरण किंवा संबंधित ठेकेदार घेत नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसणे आणि कामातील बेजबाबदारपणा यामुळेच हे अपघात वारंवार घडत आहेत. आतातरी महावितरण या कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळणे थांबवणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? असा घणाघाती सवाल नागरिक आणि कामगार संघटनांकडून विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


