(अहमदाबाद)
गेल्या गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI-171) हे विमान लंडनच्या दिशेने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा आता २७५ वर पोहोचला आहे. या अपघातात केवळ एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला असून, उर्वरित २४१ प्रवासी व क्रू मेंबर्स मृत्युमुखी पडले आहेत.
हे विमान अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले, त्यावेळी इमारतीत उपस्थित असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि अन्य कर्मचाऱ्यांपैकी ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या २७५ झाली आहे.
गर्भवती महिला, डॉक्टर व एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृत्यू
मृतांमध्ये न्यूरोसर्जन डॉक्टर, त्यांची गर्भवती पत्नी, तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारा जय प्रकाश चौधरी याचाही समावेश आहे. जय प्रकाशचा मृतदेह शुक्रवारी ओळखता आला. मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सदस्यही बळी गेले आहेत.
ब्लॅक बॉक्स २८ तासांनी सापडला
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, ब्लॅक बॉक्स तब्बल २८ तासांच्या शोधानंतर कॉलेजच्या मेसच्या छतावर आढळून आला. या ब्लॅक बॉक्समधून अपघातास कारणीभूत ठरलेल्या तांत्रिक अथवा मानवी चुकांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
८ संस्था तपासात सक्रिय
या अपघाताची चौकशी भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), विमान अपघात तपास ब्युरो (AAIB), तसेच अमेरिकेच्या (NTSB), युनायटेड किंग्डमच्या (UK-AAIB) आणि FAA यांच्यासह एकूण ८ तपास यंत्रणा करीत आहेत. तपासात कोणतीही त्रुटी अथवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मृतदेह ओळख व डीएनए तपासणी सुरू
२४१ जणांच्या डीएनए नमुन्यांची तपासणी सुरू असून, आतापर्यंत ७ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतांची ओळख पटवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
अपघातानंतर युद्धपातळीवर मदतकार्य
अपघातग्रस्त ठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम रात्रभर सुरू होते. सुमारे १०० कामगार आणि ४० अभियंते या कामात सहभागी होते. मदत व बचाव कार्यात एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या.